“सिद्धू यांची पाकिस्तानशी मैत्री त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाही”

चंडीगढ – पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. नवे मुख्यमंत्री म्हणून सिद्धू यांना बिल्कूल स्वीकारणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मागील काही काळात अमरिंदर आणि सिद्धू यांच्यातील मतभेद विकोपाला गेले. त्यातून पंजाबमध्ये सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह शिगेला पोहचला. त्याची दखल घेऊन कॉंग्रेस श्रेष्ठींनी त्या राज्यात खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला. याआधी अमरिंदर यांच्या विरोधानंतरही सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले.

त्यामुळे नाराज असलेल्या अमरिंदर यांनी मुख्यमंत्रिपद गमवावे लागल्यानंतर सिद्धू यांच्यावर तीव्र शब्दांत आगपाखड केली. मंत्री असताना सिद्धू एक मंत्रालयही व्यवस्थित हाताळू शकले नाहीत. संपूर्ण पंजाब ते कसे काय सांभाळू शकतील? ते विनाशक ठरतील.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्या देशाच्या लष्करप्रमुखांशी सिद्धू यांची मैत्री आहे. त्यामुळे ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरतील, असे अमरिंदर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आगामी निवडणुकीत कॉंग्रेसचा चेहरा म्हणून सिद्धू अमान्य असतील, असेही त्यांनी म्हटले. पंजाबमधील विधानसभा निवडणूक अवघ्या चार ते पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात प्रदेश शाखेतील दुरावा संपवण्याचे मोठेच आव्हान कॉंग्रेसपुढे उभे राहिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.