बंगलुरू: कर्नाटक राज्याचा स्वतंत्र ध्वज प्रस्तावित करण्यात आला असून त्या बाबत भाजपने जी भूमिका घेतली आहे ती पुर्णपणे निराशाजनक आहे त्यातून कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्या आहेत अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी केली आहे. सिद्धरामैय्या मुख्यमंत्री असतानाच्या काळात सन 2018 मध्ये कॉंग्रेस सरकारने या राज्याचा स्वतंत्र ध्वज असावा अशी सुचना मांडली होती. तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे संमतीसाठी पाठवण्यात आला होता. तथापी भाजपचे सांस्कृतीकमंत्री सी टी रवी यांनी कर्नाटकचा स्वतंत्र ध्वज ठेवण्यास विरोध केला आहे. त्यांचा हा विरोध राज्याची अस्मिता आणि कन्नड भाषिकांचा अवमान करणारा आहे असे सिद्धरामैय्या यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की राज्याचा स्वतंत्र ध्वज असताकामा नये असे घटनेने कोठेही म्हटलेले नाही. घटनेनुसार तिरंगा हा राष्ट्रीय ध्वज आहे. तो राहणारच आहे. कर्नाटकचा स्वतंत्र ध्वज असण्याने तिरंग्याच्या प्रतिष्ठेला कोठेही बाधा येत नाही. राज्याचा ध्वज हा नेहमी राष्ट्रध्वजाच्या खालीच फडकावण्याचा प्रस्ताव आहे असेही सिद्धरामैय्या यांनी म्हटले आहे. त्यांनी नमूद केले की राज्यातील सर्व विचारवंतांचा विचार घेऊनच राज्याचा वेगळा ध्वज प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याला विरोध करण्याचा राज्य सरकारचा इरादा कर्नाटकच्या अस्मितेवर घाला घालणारा आहे असेही त्यांनी म्हटले आहे.