बंगळुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प (बजेट) सादर केला. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून सर्वांधिक 14 वेळा कर्नाटकचे बजेट मांडण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा झाला. याआधी त्यांनी माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या 13 वेळा अर्थसंकल्प मांडण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.
अर्थसंकल्प मांडताना अर्थ खाते सांभाळणाऱ्या सिद्धरामय्या यांनी सत्तारूढ कॉंग्रेसने विधानसभा निवडणूक काळात दिलेल्या 5 हमींवर भर दिला. त्या हमींच्या अंमलबजावणीसाठी वर्षाला 52 हजार कोटी रूपये खर्च होणार आहेत. हमींचा लाभ 1.3 कोटी कुटूंबांना होईल. हमींच्या माध्यमातून राज्य सरकारकडून प्रत्येक कुटूंबाला दरमहा 4 ते 5 हजार रूपये आर्थिक मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रत्येक कुटूंबाला 200 युनिट वीज मोफत, महिलांसाठी मोफत प्रवास, गरिबांना दरमहा मोफत 10 किलो अन्नधान्य, कुटूंबातील महिला प्रमुखाला दरमहा 2 हजार रूपये अर्थसहाय्य आणि तरूणांना दरमहा 3 हजार रूपयांपर्यंत बेरोजगार भत्ता या हमी कॉंग्रेसने निवडणूक प्रचारावेळी दिल्या. त्याचा राजकीय लाभ मिळून कॉंग्रेसला कर्नाटकची सत्ता हस्तगत करणे सुलभ बनल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते.