Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा भाजपने हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी राजस्थानातील मतदानाच्या दिवशी मतदारांना आश्वासने देणारी पोस्ट एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाने त्यांच्याविरुद्ध तत्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार केली. राहुल गांधी यांचे कृत्य आचारसंहितेचे थेट उल्लंघन असल्याने त्यांचे एक्स खाते निलंबित करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
राहुल यांच्या शनिवारच्या पोस्टमध्ये राजस्थान सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आणि दिलेल्या आश्वासना संबंधित पोस्ट केली होती. राजस्थानात झालेल्या मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचेही आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने राजस्थानच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना गांधी यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश द्यावेत. तसेच राहुल गांधींचे एक्स खाते निलंबित करण्यास व अपमानजनक मजकूरही त्वरित काढून टाकण्यास एक्स कंपनीला सांगावे, अशी विनंती भाजपने केली आहे.
भाजपने निवडणूक आयोगाकडे, गांधी यांच्यावर लोकप्रतिनिधी कायदा १९५१चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे. ही राहुल गांधींच्या सोशल मीडिया पोस्टवर केंद्रित आहे. राजस्थानमधील मतदानाच्या दिवशी असा संदेश पोस्ट करणे कायद्याच्या कलम १२६नुसार गुन्हा ठरतो. या कलमानुसार मतदान संपल्यानंतर ४८ तासांच्या आत निवडणूक संबंधित कोणतीही सामग्री प्रदर्शित करण्यास मनाई आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.