प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 -हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गातील विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल आणि मेट्रोचे काम गणेशोत्सवानंतर लगेचच सुरू केले जाणार आहे. “पीएमआरडीए’ आणि महापालिका प्रशासनाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबत एकमत झाले असून, पुढील दोन ते तीन आठवडे काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले रस्त्यांचे रूंदीकरण, वाहतुकीचा बदल ही कामे केली जाणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
“पीएमआरडीए’चे आयुक्त सुहास दिवसे, महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, “पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता विवेक खरवडकर यावेळी उपस्थित होते. शहरात सध्या सुरू असलेला पाऊस आणि गणेशोत्सवात होणारी गर्दी तसेच शहरात वाढणारी वाहतूक ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
सायकल ट्रॅक काढणार
विद्यापीठ चौक ते ई-स्क्वेअर सिनेमागृहापर्यंत बहुमजली उड्डाणपूल आह. तेथून पुढे केवळ मेट्रोचा मार्ग आहे. त्यामुळे ज्या भागात बहुमजली पूल आहे, त्या भागात मेट्रोला पुलाच्या कामासाठी जादा आकाराचे बॅरीकेडींग करावे लागणार असल्याने विद्यापीठ चौक ते ई-स्क्वेअरपर्यंत गणेशखिंड रस्त्यावर असलेला सायकल ट्रॅक काढला जाणार आहे. याशिवाय विद्यापीठाकडून शिवाजीनगरकडे येताना सेंट्रल मॉलसमोरून हरे कृष्ण पथाकडे वळणारा रस्ता बंद केला जाणार आहे. त्यामुळे या रस्त्याने गोखलेनगर, मॉडेल कॉलनीकडे जाणाऱ्या वाहनांना कृषी महाविद्यालय चौकात येऊन यू-टर्न घेऊन पेट्रोल पंपासमोरून मॉडेल कॉलनीकडे जाता येणार आहे.
आधी चौकात काम
उड्डाणपुलाचे काम मुख्य चौकातून सुरू केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेची एसएनडीटी जलकेंद्राकडून पाषणकडे जाणारी 1200 मिमी व्यासाची जलवाहिनी रस्त्याच्या मध्यभागी येत असल्याने ही वाहिनी पुढील दोन आठवड्यात मॉर्डन महाविद्यालयाच्या बाजूने वळविली जाणार आहे. त्यामुळे या भागात रस्ता रूंद होणार आहे. त्यामुळे चौकातील काम सुरू झाले तरी वाहनांसाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध होणार आहे.