कात्रज, दि. 10 (प्रतिनिधी) -नवले पुलावरून कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला आयशर शो-रूमजवळ कुंभार यांच्या बिल्डिंगमध्ये भेसळयुक्त तूप तयार केले जात असल्याचे खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकत पोलिसांनी डालडा, पामतेल, कलर व अन्य घातक व विषारी रसायन तसेच मोहिंदर सिंग (रा. आंबेगाव) याला ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण 33 हजार 500 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे व पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा यांनी सदर ठिकाणी जाऊन तपासणी केली असता 150 लिटर भेसळयुक्त तूप तसेच तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनास पुढील कारवाई करण्याबाबत माहिती दिली. या संदर्भात सदरचा माल जप्त करून तपासणी करून रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी सांगितले.
दीडशे किलो भेसळयुक्त सामग्री कुंभार इमारतीतून जप्त करण्यात आली असून ती तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. अहवालानंतर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध भेसळ नियंत्रण विभागातील निरीक्षक क्रांती बारवकर यांनी सांगितले.