पिरंगुट, (वार्ताहर) -येथील बालवीर युवक मंडळाच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या श्री गणपती मंदिरात श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा कलशारोहण सोहळा होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष माजी उपसरपंच रामदास पवळे, माजी सरपंच रमेश पवळे व मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुषार पवळे यांनी दिली.
यानिमित्त रविवार, दि. 11 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी दहा वाजता कलश मिरवणूक व श्रींचे आगमन मिरवणूक सोहळा होणार आहे. तसेच सायंकाळी सात वाजता खेळ खेळू पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे.
सोमवारी सकाळी दहा वाजता गणेशपूजन, मूर्तीचा महाभिषेक, होम हवन, वास्तुशांती आदी उपक्रम होणार आहेत. तर मंगळवारी सकाळी अकरा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे कलशारोहण होणार आहे. हभप महंत लक्ष्मण महाराज फड व आचार्य मंदार महाराज येनपुरे यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे.
सायंकाळी सहा वाजता माऊली महाराज पठाडे यांचे कीर्तन होणार असून, हभप कैलास पवार, हभप ओंकार जगताप, हभप चंदू नाना पांचाळ ही दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. बुधवारी भव्य अशा पिरंगुट सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते राहुल मुकदम व अभिनेते सुमित पुसावळे हे उपस्थित राहणार आहेत.