पौड -मुळशी पुणे शहरापासून अवघ्या काही अंतरावर वसलेला मुळशी तालुक्याचा संपूर्ण कारभार हा पौड या ठिकाणाहून चालतो. मुळशी तहसील कार्यालय, पौड पोलीस स्टेशन, मोजणी कार्यालय, पंचायत समिती, शासकीय ग्रामीण रुग्णालय, बांधकाम विभाग, महावितरण, फॉरेस्ट, बँक, पोस्ट ऑफिस, दुय्यम निबंधक कार्यालय अशी सर्वच कार्यालयांमधून तालुक्यातील सर्व गावांचा कामकाज पाहिले जाते; परंतु पौड गावाचा कारभार हा पौड ग्रामपंचायत पाहते. अपुर्या निधीमुळे समस्यांकडे दुर्लक्ष होताना प्रथम दर्शनी दिसून येत आहे.
पौडमधून पुणे कोलाड महामार्ग असल्याने वाहनाची वर्दळ जास्त असते. त्यामुळे अपघात, वाहतूक कोंडी, समस्या निर्माण होत आहे. रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनी आपली दुकाने काही जागा सोडून मांडली पाहिजे. तसे न करता त्यांनी अतिक्रमण केल आहे. मात्र सर्वच शासकीय यंत्रणा कानाडोळा करताना दिसत आहे.
काही दिवसापूर्वी पौड येथे सायंकाळी एका दुकानदाराचा रस्त्यावरून चालत जात असताना अपघात झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला; परंतु ज्या वाहनांमुळे अपघात झाला त्याचा शोध घेण्यासाठी नातेवाईक व पोलिसांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागत आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते; परंतु बाकीचा ठिकाणी पाहणी केली असता दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर दिसेल असे कॅमेरे लावले आहे. त्यामुळे वाहनचालक व गाडी हिचा शोध घेणे अवघड झाले आहे. पौडची सर्व समस्यांपासून सुटका होणार का? ग्रामपंचायत मार्फत कारवाई होणार का? याकडे नागरिकांमध्ये कुजबुज सुरु आहे.
नागरिकांचा जीव मुठीत
पौड येथे ग्रामपंचायतच्या वतीने मूलभूत सोयी पुरवण्यासाठी दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांमध्ये कुजबुज सुरू आहे सार्वजनिक शौचालय, सीसीटीव्ही कॅमेरे, गतिरोधक, रस्त्याच्या साइड पट्ट्या नसल्याने नागरिकांना रस्त्याने जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.
लवकरात लवकर ग्रामपंचायतच्या वतीने सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. रस्त्याला गतिरोधक करण्यासाठी प्रयत्न करणार असून, रस्त्यालगत असणारे अनधिकृत शेड, रस्त्याला लागून असणारी दुकाने यावर पौड पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायतच्या वतीने संयुक्त कारवाई लवकरच करणार आहे. -प्रमोद शेलार, सरपंच पौड