बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर यांचे “किल छोरी’ हे नवीन गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या दिवाळी गाण्यात श्रद्धा कपूर आणि यूट्यूबर भुवन बाम झळकणार आहे. या गाण्यात श्रद्धा आणि भुवनचा जबरदस्त रोमांस पाहावयास मिळणार आहे.
ऍश किंग आणि निकिता गांधी यांचे स्वर असलेले हे गाणे वायु यांनी लिहिले आहे. हे गाणे दिवाळीत होत असलेल्या आनंदोत्सवावर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यासंदर्भात सचिन-जिगर म्हणाले, आम्ही एक पेप्पी गाणे आणणार होतो, ज्यात “किल छोरी’सोबतच पार्टी वाईब देखील असावा.
आम्हाला आशा आहे की, हे गाणे ऐकल्यानंतर श्रोते मंत्रमुग्ध होतील आणि नेहमीप्रमाणे आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील. या गाण्यातील ट्रॅक खूपच दमदार आहे, जो आपला मुड लगेच चांगला करेल आणि पार्टी करण्याचा माहोल तयार होईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, “रूही’, “हम दो, हमारे दो’ या चित्रपटांसह “भूत पुलिस’ या संगीत अल्बमसोबत सचिन-जिगर यांना हे वर्ष खूपच महत्त्वपूर्ण ठरले आहे. सचिन-जिगर यांची जोडी टेलिव्हिजनवरील आघाडीची जोडी आहे. या जोडीने आतापर्यत 5 हजारहून अधिक टेलिव्हिजन ऍपिसोडचे संगीत तयार केले आहे.