सासवड – माजी मंत्री विजय शिवतारे यांनी साधी अंगणवाडी काढली नसल्याचे विधान युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी केले आहे. माझं त्यांना आव्हान आहे. तुमच्याच गावातील सासवड- परिंचे- वीर रस्ता, परिंचे- हरणी रस्ता, 17 सिमेंट बंधारे, एसटी स्थानक, पिलाणवाडी बंद जलवाहिनी आदी 35 कोटींची कामे मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही खासदार सुप्रिया सुळे यांची फक्त 35 लाखांची कामे दाखवा, अशा शब्दांत युवासेनेचे पुरंदर तालुकाध्यक्ष मंदार गिरमे यांनी राष्टवादी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.
सासवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष डॉ. राजेश दळवी, नगरसेवक सचिन भोंगळे, अस्मिता रणपिसे, सुरज जगताप, मंगेश भिंताडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. गिरमे म्हणाले, विजय शिवतारे यांनी मागील पाच वर्षांत पुरंदरचा कायापालट केला आहे. हे तालुका जाणतो. विद्यमान खासदार आणि आमदारांनी पुरंदर तालुक्याची मागच्या तीन वर्षात वाट लावली आहे.शिवतारेंच्या काळात पुरंदर- हवेली तालुका निधीच्या बाबतीत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर होता.
आता कार्यसम्राट आमदार – खासदारांच्या काळात तालुका खालून पहिल्या क्रमांकावर असतो. शहराध्यक्ष डॉ. दळवी म्हणाले, शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यात 403 किलोमीटर रस्ते, 450 पेक्षा जास्त बंधारे, 1100 शेततळी, प्रशासकीय इमारत, जेजुरी रुग्णालय, क्रीडासंकुल, आरटीओ कार्यालय, धान्य गोदामे आदी प्रकल्प तालुक्यात आणले. केंद्राकडून खासदारांनी 15 वर्षांत आणलेला एक प्रकल्प दाखवावा, असे आव्हान यावेळी त्यांनी दिले.
ताई फक्त खड्डे बुजवा- डॉ. अस्मिता रणपिसे
नगरसेविका डॉ. अस्मिता रणपिसे म्हणाल्या की, पुरंदर तालुक्यात खासदार सुळे यांच्या अखत्यारित हडपसर सासवड जेजुरी हा राष्ट्रीय महामार्ग आहे. खासदारांना त्यावरचे खड्डेसुद्धा कधी बुजवता आले नाहीत. या रस्त्यावर लोक रोजच्या रोज जीव मुठीत धरून प्रवास करतात. खासदारांनी निदान केंद्राकडून तेवढा रस्ता तरी नीट नेटका राहील, इतकी काळजी घ्यावी, असा टोला त्यांनी लगावला.