मांजरी, दि. 23 (प्रतिनिधी) -मांजरी बुद्रुक गावातून भापकरमळा मार्गे सोलापूर रोड आणि मोरे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यात खड्डेच पडल्याने वाहनचालकच नव्हे, तर नागरिकही वैतागले आहेत. येथील आम आदमी पार्टीने यावर आवाज उठवत भापकर मळा रस्त्यावर चक्क खड्ड्यांत बसून आंदोलन केले. खड्ड्यांपासून वाहनचालकाचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे का? असा प्रश्न करत आपने प्रशासनचा निषेध नोंदवला.
आम आदमी पार्टीचे राजेंद्र साळवे यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी गजानन घुले, अशोक घुले, गंगाराम खरात, नवनाथ पाटोळे, नंदकुमार बेलेकर, बापू खवरे, अमित राखपसरे, बाळासाहेब रणपिसे, अमोल घाडगे, नंदा खरात, लक्ष्मी लोणकर, पारुबाई भोकरे, रोहिणी शेंडकर, दादा आटोळे आदीजण या आंदोलनात सहभागी झाले होते. महापालिका पथ विभागाचे उपअभियंता प्रवीण येळे यांनी याबाबतचे निवेदन स्वीकारले.
मांजरी गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर प्रशासनाने येथे नागरी सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यातच वारंवार सांगूनही खड्डे बुजवले जात नाहीत. त्यामुळे आम्ही प्रशासनाचा निषेध करत खड्ड्यात बसून पालिकेचे लक्ष वेधले आहे.
– राजेंद्र साळवे, आम आदमी पार्टी