पिंपरी, दि. 24 – पिंपरी चिंचवड शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला आहे. त्यामुळे येथील शाळाही स्मार्ट होतील अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेच्या प्राथमिक शाळेत तब्बल 285 शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांवर दोन वर्ग सांभाळण्याची वेळ आली आहे.
महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण 105 शाळा आहेत. यामध्ये 18 हजार 893 मुले तर 20 हजार 737 मुली शिक्षण घेत आहेत. तर फक्त प्राथमिक विद्यार्थ्यांची संख्या 34 हजार 735 इतकी आहे. त्यांच्यासाठी 937 शिक्षक आणि 68 मुख्याध्यापक आहेत. महापालिका शाळेच्या 87 इमारती शहरात आहेत. एका वर्गात 30 विद्यार्थी संख्या पकडल्यास त्यांना शिकविण्यासाठी एक हजार 158 शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र तेवढी शिक्षक संख्या महापालिकेच्या शिक्षण विभागात नाही.
करोनाच्या काळात दोन वर्ष शाळा बंद होत्या. त्यापूर्वीच 175 शिक्षकांची कमतरता होती. गेल्या दोन वर्षांत काही शिक्षक निवृत्त झाले आहेत. तर काहींनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. तसेच यंदाच्या वर्षी विद्यार्थी संख्येमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्राथमिक विभागामध्ये 285 शिक्षकांची भरती करण्याची गरज आहे. यापूर्वी माध्यमिक शाळेत मानधनावर शिक्षक भरती करण्यात आली. त्यावेळी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना 24 हजार इतके मानधन देण्यात येते, असे प्रशासनाने सांगितले.
स्मार्ट सिटीतील शिक्षकांचा आधार
पिंपरी चिंचवड शहराप्रमाणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थीही खासगी शाळेच्या बरोबरीने स्मार्ट व्हावेत, यासाठी स्मार्ट सिटीकडून 261 शिक्षकांची नियुक्ती केली आहे. हे शिक्षक इंग्रजी, विज्ञान आणि आयटी हे विषय महापालिकेच्या शाळेत शिकवत आहेत. या विषयांपुरतीच त्यांची जबाबदारी आहे. मात्र सध्या शिक्षक कमी असल्याने स्मार्ट सिटीकडून आलेले शिक्षक महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांना मदत करतात.
दिवाळीनंतर महापालिकेच्या शाळेतील प्राथमिक विभागाकरिता मानधनावर शिक्षक भरती केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. आयुक्तांशी याबाबत चर्चा झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– संदीप खोत, उपायुक्त