शेवगाव (प्रतिनिधी) – शेवगावमधील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने रिकाम्या वर्ग खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. आदेश विजय म्हस्के (वय 18, रा. पवारवस्ती, शेवगाव) असे त्याचे नाव असून, तो अकरावी वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. या प्रकरणी शेवगाव पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
गुरुवारी सकाळी अकरावीच्या वर्गात विद्यार्थी आले असता रिकाम्या वर्गात छताच्या पाइपला आदेश गळफास घेवून लटकलेल्या स्थितीत आढळून आला. ही माहिती विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिली. विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य करमसिंग वसावे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस कर्मचारी अभिषेक बाबर, रामहरी खेडकर यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्यावेळी मृत विद्यार्थ्याचे नातेवाइकही उपस्थित होते.
गळफासासाठी म्हस्के याने ओढणी वापरली आहे. ही ओढणीही त्याने घरूनच नेली होती, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली. आदेश हा एकलकोंडा होता. कोणाशीही मिसळत नव्हता, अशी माहिती त्याच्या आईने पोलिसांना दिली. मानसिक असंतुलानातून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज असल्याचे शेवगाव पोलिसांनी सांगितले. आदेशच्या मागे आई व तीन बहिणी असा परिवार आहे.
रात्री हरविल्याची तक्रार..!
दोन-तीन दिवस शाळेत जाणार नाही. त्यासाठी शिक्षकाची परवानगी घेऊन येतो, असे तो आईला सांगून घराबाहेर पडला होता. परंतु बुधवारी रात्री अकरा वाजेपर्यंत तो घरी आला नव्हता. त्यामुळे आई लक्ष्मीबाई व इतर नातेवाइकाने त्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. त्यानंतर रात्री अकरा वाजता शेवगाव पोलिस स्टेशनला मुलगा हरवल्याची तक्रार आईने दिली होती. परंतु दुसर्या दिवशीच वर्गात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे त्याने बुधवारी रात्री, की गुरुवारी सकाळी आत्महत्या केली? हे मात्र समजू शकले नाही.