तामीळनाडूत फटाक्‍यांच्या कारखान्यात स्फोट; 5 कामगारांचा मृत्यू

चेन्नई – तामीळनाडूत गुरूवारी फटाक्‍यांच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन 5 कामगार मृत्युमुखी पडले, तर 6 जण जखमी झाले. ती दुर्घटना विरूधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीनजीक घडली.

स्फोटानंतर फटाक्‍यांच्या कारखान्याला आगीने घेरले. त्या दुर्घटनेत रसायने साठवून ठेवण्यात आलेल्या डझनभर शेडची अक्षरश: राखरांगोळी झाली. स्फोट आणि आगीची माहिती समजताच बचाव आणि मदत पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले.

काही तासांच्या शर्थीनंतर आग आटोक्‍यात आणण्यात यश आले. स्फोटाचे नेमके कारण लगेचच समजू शकले नाही. विरूधुनगरमधील फटाक्‍यांच्या कारखान्यात अशाप्रकारची दुर्घटना चालू महिन्यात दुसऱ्यांदा घडली आहे. याआधी 2 फेब्रुवारीला घडलेल्या दुर्घटनेत सुमारे 20 जणांना जीव गमवावा लागला होता.

शिवकाशी परिसरात फटाक्‍यांचे अनेक कारखाने आहेत. मात्र, तिथे पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या जात नसल्याचे वारंवार पुढे आले आहे. त्यातून स्फोट आणि आगीच्या अनेक दुर्घटना आतापर्यंत घडल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.