नवी दिल्ली : १९९३ मधील मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. कारण भारतात अतिरेकी कारवाया करण्यासाठी तयारी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊद इब्राहिम विरोधात एक एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या माध्यमातून ही माहिती समोर आली असल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने म्हटले आहे.
दाऊद इब्राहिम हा भारतात घातपात घडवण्याच्या तयारीत असून यासाठी त्याने एक विशेष टीम तयार केली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही टीम भारतातील महत्त्वाचे राजकीय नेते, प्रमुख उद्योजक यांना लक्ष्य करणार असल्याचे एफआयआरमधून उघड झाले आहे.
एवढंच नाही तर स्फोटकं आणि घातक शस्त्रास्त्रे यांच्या सहाय्याने देशामध्ये विविध भागामध्ये हिंसाचार घडवण्याची योजना दाऊद इब्राहिमने आखली असल्याची माहिती आहे. यामध्ये दिल्ली आणि मुंबई या शहरांना लक्ष्य केले जाणार असल्याची माहिती उघड झाल्याचे वृत्त इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे.
दरम्यान ईडीने १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला मनी लाँडरिंगच्या चौकशीच्या संदर्भात शुक्रवारी अटक केली. कारागृहात असलेल्या कासकरवर नुकताच मनी लाँडरिंग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे ही घडामोड घडत असतांना दाऊद इब्राहिमबद्दलची ही खळबळजनक माहिती समोर आली आहे.