धक्कादायक ; सोलापूर जिल्हा कारागृहातील तब्बल ३४ कैद्यांना करोनाची लागण

सोलापुर: सोलापुरात करोनाचा प्रादुर्भाव  वाढतच चालला आहे. चिंताजनक बाब म्हणजे लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याच्या अखेरीस करोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील तीन दिवसांतच सोलापुरात तब्बल दोनशे रुग्ण वाढले आहेत. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत नव्याने आढळलेल्या १०३ रुग्णांमध्ये सोलापूर जिल्हा कारागृहातील तब्बल ३४ कैद्यांचा समावेश आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येन कैद्यांना करोना झाल्याने असल्यामुळे एकच खळबळ उडाली. याच कारागृहातील एका कर्मचाऱ्यालाही करोनाने बाधित केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता.

जिल्हा कारागृहात तीन दिवसांपूर्वी एका कैद्याला करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर याच कारागृहातील एका कर्मचा-यालाही करोनाबाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातील कैद्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असता त्यापैकी ३४ कैदी करोनाबाधित निघाले. सोलापुरातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ८५१ झाली आहे. शुक्रवारी सापडेल्या १०३ रुग्णांमध्ये बार्शी तालुक्यातील जामागाव येथील तीन महिला व कुंभारीच्या विडी घरकुलातील एक महिला अशा चार ग्रामीण महिला करोनाग्रस्त झाल्या आहेत. दरम्यान, अद्याप ४९९ चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.

सोलापुरात करोनाबाधित पहिला रुग्ण १२ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्या वाढत गेली असताना प्रामुख्याने वृध्द मंडळीच करोनाच्या विळख्यात येत असल्याचे पाहावयास मिळते. २० मे पर्यंत रुग्णसंख्या ४७०, तर मृतांची संख्या ३३ इतकी होती. गेल्या दहा दिवसांत रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट गतीने वाढून ८५१ झाली आहे. मृतांच्या संख्येतही तेवढय़ाच गतीने वाढ झाली आहे. मृतांचा आकडाही आता ७२ झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.