बुलढाणा – शेगाव तालुक्यात पोलिसाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. मात्र, टिप्पर चालकाने पोलिसाला धडक देऊन गंभीर जखमी केले. एवढ्यावरच थांबता ठार झाल्याची खात्री करण्यासाठी टिप्पर चालकाने आपले वाहन मागे घेऊन पुन्हा पोलिसाला चिरडले.
माहितीनुसार, माटरगाव गावाजवळील पूर्णा नदीच्या काठावरुन एक विना नंबरचा टिप्पर रेती घेऊन खामगाव शहराकडे जात असल्याची माहिती जलंब पोलीस ठाण्याचे स्टेशनचे पोलीस उमेश सिरसाट यांना मिळाली. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्यासोबत एका होमगार्डला घेऊन दुचाकीनं त्या वाळूची वाहतूक करणाऱ्या गाडीचा पाठलाग केला.
पाठलाग करत असलेल्या उमेश शिरसाट यांनी काही अंतरावर या गाडीच्या पुढे जाऊन आपली दुचाकी टिप्पर पुढे आडवी करून उभी केली. दरम्यान, यानंतर टिप्पर चालकाने आपले वाहन थेट पोलीस कॉन्स्टेबल उमेश सिरसाट यांच्या अंगावरून पुढे नेले. त्यानंतर पुन्हा एकदा त्यानं आपलं वाहन त्यांच्या अंगावरून नेलं. त्यानंतर टिप्पर चालकानं या वाळूच्या गाडीसह खामगावकडे पोबारा केला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोहोचले. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तसंच वाहनाचा शोध घेण्याचं कामही सुरू आहे.