मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाविरुद्ध युद्ध पातळीवर लढणाऱ्या योद्ध्यांमध्येच संसर्ग वाढल्याचे चिंताजनक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील तब्बल 531 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 51 अधिकारी आणि 480 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर कर्तव्य बजावणाऱ्या पाच पोलिसांनी प्राण गमावले आहेत.
सद्यस्थितीत 43 अधिकारी आणि 444 कर्मचारी कोरोनासंक्रमित आहेत. तर आतापर्यंत 39 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये आठ अधिकारी आणि कर्मचारी आहेत. तर मुंबईतील तीन तसेच पुणे आणि सोलापूरमधील प्रत्येकी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.