बारामती- वीजबिलांच्या थकबाकीमुळे नियमानुसार वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही बारामती मंडलमधील 74 वीजग्राहक अनधिकृतपणे वीजवापर करीत असल्याचे आढळून आले. या सर्व 74 पैकी 65 थकबाकीदारांविरुद्ध वीजचोरीच्या कलम 135 अन्वये कारवाई सुरू असून 9 जणांविरुद्ध अनधिकृत वीजवापर केल्याप्रकरणी कलम 126 अन्वये कारवाई करण्यात येत आहे. यातील 41 ग्राहकांकडून थकबाकी व दंडाची अशी एकूण 7 लाख 84 हजार रुपये वसूल करण्यात आले आहे. तर गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या पथकांद्वारे वीजपुरवठा खंडित केलेल्या 757 थकबाकीदारांच्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली आहे.
वारंवार आवाहन करूनही वीजबिलांच्या थकबाकीची रक्कम न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगाने सुरु आहे.तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्याची महावितरणच्या प्रणालीमध्ये नोंद झाल्यानंतर अशा ग्राहकांच्या वीजजोडण्यांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येत आहे.
यासाठी पुणे प्रादेशिक विभागासोबतच परिमंडल, मंडल व विभागस्तरावरील वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे व गेल्या तीन दिवसांपासून ही पथके बारामती मंडलमधील बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर तालुक्यात तपासणी करीत आहेत. रात्रीच्या कालावधीत सुद्धा ही तपासणी सुरु आहे.
या ठिकाणी आढळले 74 ग्राहक बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये (बारामती विभाग) वीजपुरवठा खंडित केलेल्या 367 ग्राहकांच्या वीजजोडण्यांची तीन दिवसांत तपासणी करण्यात आली. यामध्ये 30 थकबाकीदार वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही वीजचोरी करीत असल्याचे आढळून आले. भोर व पुरंदर तालुक्यामध्ये (सासवड विभाग) तपासणी केलेल्या 138 पैकी 5 थकबाकीदारांनी वीजचोरी तर 9 थकबाकीदारांनी शेजाऱ्यांकडून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे आढळून आले. शिरूर व दौंड तालुक्यामध्ये (केडगाव विभाग) तपासणी केलेल्या 252 पैकी 30 ग्राहकांकडे चोरीद्वारे वीजवापर सुरू असल्याचे आढळून आले.