World Cup 2023 India vs Sri Lanka Match : एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत भारत हा एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. मुंबईतील वानखेडे येथे श्रीलंकेविरुद्ध खेळवण्यात आलेला सामना 302 धावांनी जिंकून या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा टीम इंडिया पहिला संघ ठरला आहे. विश्वचषकातील सर्व सामन्यांमध्ये भारताच्या विजयात संघाच्या फलंदाजांसोबत गोलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी विरोधी संघातील आघाडीच्या फलंदाजांना कोणत्याही सामन्यात जास्त वेळ मैदानात टिकू दिले नाही. तर संथ खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा मधल्या षटकांमध्ये विकेट घेतात. या स्पर्धेत भारताची आक्रमक गोलंदाजी पाहून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शोएब अख्तरने दिली प्रतिक्रिया …
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची बॉलिंग पाहताना पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरने टीम इंडियाला क्रूर टीम म्हटलं आहे. स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्येही भारताची अशीच कामगिरी कायम राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. अख्तर म्हणाले, ‘भारत आता क्रूर संघ बनला आहे. आता यांना थांबवण, रोखणं अशक्य आहे.
अख्तरने केले शमीचे कौतुक..
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मोहम्मद शमीने श्रीलंकेविरुद्ध शानदार गोलंदाजी करत अवघ्या 18 धावांत पाच बळी घेतले. या स्पर्धेत शमीने आतापर्यंत तीन सामन्यांत 14 बळी घेतले आहेत. यासह शमीने झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांना मागे टाकत विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. शमीच्या गोलंदाजीवर शोएब अख्तर खूप खूश आहे.
शमीचे कौतुक करताना पाकिस्तानचा माजी गोलंदाज म्हणाला, ‘मी शमीसाठी खूप आनंदी आहे. त्याने आपली लय परत मिळवली आहे. त्याने वर्ल्डकपमध्ये 45 विकेट घेतल्या आहेत. शमीशिवाय अख्तरने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या गोलंदाजीचेही कौतुक केले आहे.
#CWC23 #INDvSL : टीम इंडियाचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश; श्रीलंकेचा विक्रमी धावांनी केला पराभव …
दरम्यान, विश्वचषक 2023 स्पर्धेत गुरूवारी भारताने श्रीलंकेला 55 धावांवर रोखून 302 धावांनी सामना जिंकला. आता टीम इंडियाचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी 5 नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे.