नांदेड – शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी शिवसेनेला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय का घेतला याविषयी बोलताना सुभाष साबणे यांना रडू कोसळले. साबणे यांच्या शिवसेना सोडण्याच्या निर्णयानंतर भाजपने त्यांना पक्षप्रवेशाच्या आधीच देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे.
शिवसेना सोडण्याचं नेमकं कारण काय याविषयीही एका खासगी वृ्त्तवाहीनीशी बोलताना साबणे म्हणाले, देशाच्या पंतप्रधानाला देखील काळे झेंडे दाखवले जातात. मात्र, नांदेडमधील बिलोली तालुक्यात काळे झेंडे दाखवले म्हणून पोलिसांनी शिवसैनिकांना बुटासह तुडवले. शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही हा प्रकार घडला. मला वाईट वाटले. म्हणून मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. 1984 पासून मी शिवसैनिक आहे. ज्या दिवशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अटक होणार होती त्या दिवशी आम्ही विधानसभेत मोडतोड केली होती. त्यामुळे 1 वर्षासाठी आम्ही निलंबित झालो. ते दिवसही आम्ही पाहिले. चांगल्या वाईट दिवसांमध्ये आम्ही शिवसेनेसोबत होतो, अशी प्रतिक्रिया सुभाष साबणे यांनी दिली आहे.
दरम्यान, नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर 10 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा पक्षप्रवेश होण्याआधीच त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसने दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलालाच संधी दिली आहे.