“शिवसैनिकांनी तुम्हाला शिवप्रसाद दिलाय, आता शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका”; संजय राऊतांचा भाजपला इशारा

मुंबई : भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.याच प्रकरणावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना शिवसैनिकांनी तुम्हाला शिवप्रसाद दिलाय, आता शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका,  असा इशाराच संजय राऊत यांनी  दिला.

राम मंदिरासंदर्भात ‘सामना’त केलेल्या टीकेवर काल भाजपने शिवसेना भवनासमोर निषेध आंदोलन केले. त्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथे जमले आणि दोन्ही गटात तुफान राडा झाला. यावर प्रतिक्रिया विचारली असताना संजय राऊत यांनी शिवसेना भवनाकडे वाकडी नजर टाकणाऱ्यांना प्रसाद मिळतच राहणार असल्याचे म्हटले.

संजय राऊत म्हणाले की, “जेव्हा जेव्हा शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तेव्हा तेव्हा अशाप्रकारचा राडा झाला आहे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. ती बाळासाहेब ठाकरे यांची वास्तू आहे. त्याच्यावर चाल करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवसैनिक आणि मराठी माणूस गप्प बसेल का? शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रसाद मिळणारच हे मी ऑन रेकॉर्ड सांगतो.”

राम मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप झाला आहे. जर ते आरोप राम मंदिराबाबत बदनामीसाठी केले असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा असं ‘सामना’च्या अग्रलेखातून स्पष्ट म्हटलं आहे. भाजपवर थेट आरोप केलेला नाही. मग ही टीका भाजपला का झोंबली? राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास ही स्वायत्त संस्था आहे, त्यात भाजपचे कार्यकर्ते आहेत का? श्रद्धेच्या वास्तूबाबत खुलासा विचारणं हा गुन्हा झाला का? असे सवाल संजय राऊत यांनी विचारले. तसंच “ज्यांनी काल हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. आमच्याकडून विषय संपलेला आहे,” असेही त्यांनी म्हटले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.