Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्वत्र जोरदार तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती 19 फेब्रुवारीला असते. त्यानिमित्त आज सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर 394 वा शिवजयंतीनिमित्त मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय पातळीवर या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच मंत्रिमहोदयांच्या उपस्थिती हा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शिवनेरी आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. सकाळी शिवाई देवीची शासकीय महापूजा आयुक्त कुलकुलवार व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत होईल. सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री येथे उपस्थित राहणार आहेत.
किल्ले शिवनेरी वर मुख्यमंत्री तसेच प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित सकाळी शिवजयंतीचा मुख्य सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. शिवनेरीवरील वनविभागाच्या शिवाई देवराई आणि वन उद्यानाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मर्दानी खेळासह विविध कार्यक्रम होणार आहेत.
मोठ्या संख्येने शिवनेरीवर शिवप्रेमी दाखल
शिवजयंती निमित्त मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने शिवनेरीवर शिवप्रेमी दाखल झाले आहेत. मात्र मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर शिवप्रेमींना 10 वाजल्यापासून गडावर सोडण्यात येणार आहे.