राहुरी – तालुक्यातील राजकारण व समाजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेले शिवाजीराजे रामभाऊ गाडे (वय 56) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज (दि.2) नगरला खासगी रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, आई, दोन मुले विशाल व धनराज, सून, नातवंडे असा परिवार आहे. आज पहाटे दोनचे दरम्यान त्यांना छातीत त्रास होवू लागला. प्रथम राहुरी व नंतर त्यांना नगरला खासगी रुग्णालयात नेले गेले. तेथे उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले.
बारागावनांदूरचे सरपंचपदापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दस प्रारंभ झाला. सुरुवातीला राहुरी तालुका विकास मंडळ व नंतर जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत होते. मुळा प्रवरा वीज सहकारी संस्थेचे ते प्रथमच संचालक झाले आणि या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. राहुरी तालुका पंचायत समितीचे सदस्य व नंतर सभापतीपद त्यांनी भूषवले. बारागावनांदूर व 14 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा समितीचे ते अनेक वर्षापासून अध्यक्ष आहेत. राहुरी पंचायत समितीस त्यांचे नेतृत्वाखाली राज्य व विभागस्तरीय पुरस्कार मिळाले. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक होते. त्यांचे नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने कारखाना निवडणूकीत चांगले यश मिळविले होते. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संधटना व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विधानसभा लढवली होती.
जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य होते. बारागावनांदूर या गावी त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी शिवाजीराजेंच्या अखेरच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते यांचा यात समावेश होता. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, राजेंद्र फाळके, आमदार वैभव पिचड, माजी आमदार प्रसाद तनपुरे, चंद्रशेखर कदम, पांडुरंग अभंग, भानुदास मुरकुटे, राजेंद्र फाळके, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, डॉ. सुजय विखे पाटील, राजश्री घुले, संजीव भोर,सचिन जगताप, बाळासाहेब चव्हाण, ऊध्दव दुसुंगे, रावसाहेब साबळे, बाबासाहेब भिटे, रावसाहेब शेळके, चाचा तनपुरे, बाळासाहेब जाधव, शशीकांत गाडे, बाळासाहेब लटके, डॉ. उषाताई तनपुरे, सुनील गडाख, अजित कदम, संदीप वर्प, सीताराम गायकर, सुरेश वाबळे, शिवाजी कपाळे, बाबासाहेब भिटे आदींनी शिवाजीराजे गाडे यांना श्रध्दांजली अर्पण केली.
सर्वांसाठी मदत करणारे, अनेकांना आधार देणारे नेतृत्व आपल्यातून हरपले आहे. ते राजकीय विरोधक होते; पण हा विरोध त्यांनी मनात कधीच ठेवला नाही. सतत विकासाच्या कामांचा, प्रश्नाचा पाठपुरावा करणारा नेता हरपला आहे.
शिवाजी कर्डिले,आमदारत्यांच्या निधनाने सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला आहे. तालुक्याची मोठी हानी झाली आहे. सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे नेतृत्व हरपले आहे.
प्राजक्त तनपुरे,नगराध्यक्ष, राहुरी नगरपालिका