कराड – कराड-पाटण मार्गावर निसरे फाटा (ता. पाटण) हद्दीत वाहनांची तपासणी करताना दोन वाहनांमध्ये 45 लाखांची रोकड सापडली. दरम्यान, एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या ठेकेदाराच्या गाडीत सापडलेली ती रोकड दोन बॅंकांची असल्याची माहिती दिल्याने त्याबाबतची खात्री करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
कराडहून पाटणला जाणाऱ्या चारचाकी गाडीत (क्र. एम. एच. 09 – ई. एम. 5579) 44 लाख रूपये सापडले. ती गाडी स्टेट बॅंक व एचडीएफसी बॅंकेच्या एटीएममध्ये रक्कम भरणाऱ्या ठेकेदाराची असल्याचे घटनास्थळी सांगण्यात येत होते. मात्र, गाडी चालकाकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने रात्री उशिरापर्यंत त्या पैशांबाबत खात्री करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू होती. दरम्यान, याचवेळी एका सिमेंट व्यापाऱ्याकडे 92 हजार 400 रुपये सापडले. त्याचीही खात्री केली जात होती.