पुणे, दि. 16 – नऱ्हे-आंबेगाव येथे साकारण्यात येत असलेल्या “शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार आहेत. यातील “सरकारवाडा’ या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, संशोधन ग्रंथालय, प्रदर्शन आणि बहुपयोगी सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय गड-किल्ल्यांची सफर, राज्याभिषेकाचा देखावा, महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका हे प्रसंग “थ्री-डी’ तंत्रज्ञान वापरुन साकारण्यात आले आहेत.
चार टप्प्यांत तयार होत असलेल्या या प्रकल्पाचा खर्च साधारण 438 कोटी रुपये इतका आहे. पहिल्या टप्प्यात 60 कोटी रुपये उत्स्फूर्तपणे देणगीदारांकडून आतापर्यंत या प्रकल्पाला मिळाले आहेत. “जाणता राजा’ या महानाट्याच्या प्रयोगातून काही निधी उपलब्ध झाला आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या 12 हजारांपेक्षा जास्त व्याख्यानांच्या माध्यमातून जो निधी उभा केला, या सगळ्यांच्या मदतीने शिवसृष्टीच्या कार्याला सुरुवात झाली आहे. शिवसृष्टीचा पहिला टप्पा हा दि. 1 डिसेंबरपासून शिवप्रेमींसाठी खुला होणार असून, यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक असल्याचेही कदम यांनी नमूद केले.
काय पाहता येणार
नजीकच्या भविष्यात पूर्णत्वास येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पामध्ये 21 एकर परिसरात एक दिवसाची ऐतिहासिक “थीम पार्क’ची सफर शिवप्रेमींना करता येणार असून, महत्त्वाच्या किल्ल्यांचे “व्हर्च्युअल रिऍलिटी’द्वारे होणारे दर्शन, प्रतापगडावरील भवानी मातेचे मंदिर, शिवकालीन अस्त्रांचे शस्त्रागार, दरबार, महाराजांनी सुरू केलेल्या चलनी शिवरायी आणि राजमुद्रा, अश्वशाळा, व्यापारी पेठ, रंगमंरिर, विजयस्तंभ, राजवाडा, नगारखाना या ठिकाणी पाहायला मिळेल. “मॅड मॅपिंग’ सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शिवप्रेमी थेट छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकू शकतील, हे या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे.