आणखी तीन महिने पाच रुपयांत शिवभोजन

केशरी शिधापत्रिकाधारकांना देखील दोन महिने सवलतीच्या दरात धान्य

मुंबई – लॉकडाऊन संपलेला असला तरी असामान्य परिस्थितीमुळे आणखी तीन महिने 5 रुपयांमध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे करोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये, यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये गरजूंना जेवण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र, अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे.

शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी 11 ते 3 या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी शासनाने 160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मे आणि जून महिन्यामध्ये एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रति व्यक्ती देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतलेला होता. सदर योजना आणखी दोन महिने चालू ठेवली जाणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या 3 कोटी 8 लाख नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.