भारताला 60 लाख कोटी रुपयाच्या थेट परकीय गुंतवणुकीची गरज – गडकरी

नवी दिल्ली- करोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे. यातून अर्थव्यवस्था पूर्ण क्षमतेने रुळावर येण्यासाठी भारताला 50 ते 60 लाख कोटी रुपयांच्या थेट परकीय गुंतवणुकीची गरज आहे, असे रस्ते वाहतूक व लघुउद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

ही गुंतवणूक पायाभूत सुविधा आणि लघुउद्योगात आकर्षित करण्यास वाव आहे. महामार्ग, विमानतळ, जल वाहतूक, रेल्वे, ब्रॉडगेज, मेट्रो आणि लघु उद्योगात ही गुंतवणूक होण्याची गरज आहे. बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था भारतात विविध क्षेत्राना कर्ज पुरवठा करतात. मात्र त्याच्याकडे भांडवल नाही. त्याना परकीय गुंतवणूकीतून भांडवल मिळू शकते, असे गडकरी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

दुबई आणि लगतचा प्रदेश, युरोप आणि अमेरिकेतून ही गुंतवणूक आकर्षीत करण्यासाठी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न चालू असल्याचे गडकरी यांनी सांगितले. लघु उद्योगांना भांडवल बाजारातून भांडवल मिळावे याकरीता भारतात शेअर बाजारावर या उद्योगांची नोंदणी करण्याचे पयत्न सुरु आहेत. त्यानंतर या माध्यामातून परकीय गुंतवणूकदारांनाही या उद्योगांत गुंतवणूक करता येऊ शकणार आहे.

बऱ्याच पतमानांकन संस्थांनी भारताबाबत नकारात्मक मत नोंदविले असले तरी शेअर बाजारातील निर्देशांक वाढत आहेत. याचा अर्थ परकीय गुंतवणूकदारांचा भारततावरील विश्‍वास कायम आहे. त्यामुळे इतर क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक वाढण्यास वाव असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.