सातारा (प्रतिनिधी) – शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सातारा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक उद्या, दि. 16 रोजी दुपारी 1 वाजता कोरेगाव येथे होणार असल्याची माहिती माजी उपजिल्हाप्रमुख दत्ताजीराव बर्गे यांनी दिली.
या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते व सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून जनसंपर्क अभियानात अनेक गावांना भेटी दिल्या. त्यामध्ये कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांची मते जाणून घेण्यात आली.
या अभियानानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आपल्याला फोनवरून संपर्क साधून, निवडणूक लढवण्यासंदर्भात विचारणा केली होती. गेली 30 ते 40 वर्षे पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणार्या निष्ठावान शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बर्गे यांनी दिली.