मुंबई, दि. 19 – नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबाराची घटना ताजी असतानाच, आज मुंबईतील विक्रोळी येथेही गोळीबाराचा प्रकार घडला. हा गोळीबार शिवसेना उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव (वय 56 वर्ष) यांच्यावर करण्यात आला असून यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गोदरेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून हल्ल्यातील शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.
ही घटना आज सकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. चंद्रशेखर जाधव सकाळी मुलासोबत नेहमीप्रमाणे विक्रोळीतील टागोरनगर इथल्या साईबाबा मंदिरात दर्शनाला गेले होते. यावेळी मंदिरातून बाहेर पडत असताना हल्लेखोराने त्यांच्यावर तीन राऊंड फायर केले, ज्यात एक गोळी त्यांच्या डाव्या खांद्याला लागली.
खांद्याला गोळी लागल्याने चंद्रशेखर जाधव यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. हल्ल्यानंतर स्थानिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विक्रोळी पोलिसांनी त्याच्याकडील शस्त्रही जप्त केले आहे. आता चौकशीतच हल्ल्याचे कारण समोर येईल. दरम्यान, विक्रोळी हा शिवसेनेचा गड समजला जातो. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.
दरम्यान, चंद्रशेखर जाधव यांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार, जाधव यांना काही दिवसांपासून धमक्या येत होत्या. त्यामधूनच हा हल्ला झाला आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.