हडपसर – हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी बुद्रुक या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. येथील नागरिकांना दैनंदिन जीवनात प्रवास करत असताना वाहतूक कोंडी सारख्या समस्येला दररोज सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही प्रशासन कोणताही ठोस असा निर्णय घेत नसल्यामुळे, काही दिवसांपूर्वी मुंढव्यातील महात्मा फुले चौकात शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
त्यावेळी आंदोलन मागे घेण्यासाठी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मध्यस्थी करत हडपसरला वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी लवकरच सविस्तर बैठक घेऊ असा शब्द दिला होता.ती महत्वाची बैठक आज झाली असून येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपयुक्त उपाययोजना करण्यात येत आहेत, असे सांगून आपले आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केला आहे.
अधिक माहिती देताना नाना भानगिरे यांनी सांगितले की, नुकतेच मुंढवा चौकात केलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी भागात वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडी बाबत निवेदन दिले.
तसेच, निवेदनाच्या माध्यमातून घोरपडी व कोरेगाव पार्क मार्गे मुंढव्यापर्यंत भुयारी मार्ग करण्यात यावा. केशवनगर, मांजरी रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता अरुंद करावा. रस्त्यात येत असलेल्या झाडांच्या फांद्या व महावितरण चे पोल व डी. पी बॉक्स यांचे व्यवस्थापन करावे. अशा प्रकारची मागणी केली. व इतर विविध विषयांवर चर्चा केली.यावेळी बैठकीला पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, प्रसाद काटकर व ढवळे तसेच, इतर विविध विभागातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.