शिवसेना आमदाराने मोफत पेट्रोलसाठी दिला नारायण राणेंच्या पेट्रोल पंपाचा पत्ता; पण घडलं दुसरंच काहीतरी

मुंबई : शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली होती.  भाजपचे  सदस्यत्व ओळखपत्र दाखवणाऱ्या प्रत्येकी १ लीटर पेट्रोल मोफत वाटपाचा कार्यक्रम वैभव नाईक यांनी जाहीर केला होता.  विशेष म्हणजे हे पेट्रोल वाटप भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर होणार होते. त्यामुळे भाजपला धोबीपछाड देण्याचा कार्यक्रमच वैभव नाईक यांनी आखला होता. मात्र हा डाव त्यांच्यावरच उलटला असल्याचे सांगण्यात येत आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन भाजपला डिवचण्याचं वैभव नाईक यांचे हे आंदोलन आता उलटताना दिसत आहे. कारण वैभव नाईक यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलेल्या कुडाळ येथील भारत पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे वैभव नाईक यांचा या पेट्रोल पंपावरील नियोजित पेट्रोल वाटपाचा कार्यक्रम होऊ शकला नाही.

मग आमदार वैभव नाईक यांनी दुसऱ्या पेट्रोल पंपावर स्वस्त दरात पेट्रोल वाटपाचा निर्धार केला. तर त्याही पेट्रोल पंप व्यवस्थापनानं आता पोलीस स्टेशन गाठलं आहे. पेट्रोल-डिझेल वाटपात आम्हाला कोणताही राजकीय अभिनिवेश ठेवायचा नाही अशी भूमिका पेट्रोल पंप मालकांनी घेतली आहे. त्यामुळे वैभव नाईक यांचं भाजपला डिवचण्यासाठीचं अनोखं आंदोलन आता त्यांच्यावर उलटताना दिसत आहे.

वैभव नाईक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा कणकवली, वागदेमध्ये पेट्रोल पंप आहे. परंतू वैभव नाईक हे कुडाळ-मालवण मतदारसंघातून आमदार आहेत. जो नारायण राणेंचा मतदारसंघ आहे. तेथून पहिल्यावेळी ते नारायण राणेंना हरवून निवडून आले होते. नाईकांचा पेट्रोल पंप त्यांच्या मतदारसंघात नसल्याने राजकीय उद्देशासाठी त्याचा ते वापर करू शकत नाहीत.

तो पेट्रोल पंप नारायण राणेंचे आमदार पूत्र नितेश राणेंच्या मतदारसंघात आहे. मालवण शहरात एकच पेट्रोल पंप आहे, तो देखील राणेंच्याच मालकीचा आहे. यामुळे आता वैभव नाईकांना त्यांचे डावपेच फोल जाऊ द्यायचे नसतील तर कुडाळ शहराबाहेरील पेट्रोल पंपांचा आधार घ्यावा लागणार आहे. परंतू हे पेट्रोल पंप लांब असल्याने त्यांचा प्रयत्न तेवढा यशस्वी ठरणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.