पिंपरी विधानसभेसाठी भाजपाचे अमित गोरखे भरणार अपक्ष म्हणून अर्ज
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना भाजप महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दिसून येत असतानाच बंडाळीच्या ठिणग्या उडताना दिसू लागल्या आहेत. भाजपाचे नेते आणि आण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे हे पिंपरीतून अपक्ष म्हणून उद्या अर्ज भरणार आहेत. युतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात विधानसभेचे तीन मतदारसंघ असून त्यापैकी चिंचवड व भोसरी हे दोन मतदारसंघ भाजपाकडे तर शिवसेना हा मतदारसंघ शिवसेनेकडे जागा वाटपामध्ये देण्यात आला आहे. या तीनही ठिकाणचे उमेदवार दोन्ही पक्षांनी जाहीर केले असून पिंपरीतून विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाची गेल्या काही वर्षांत ताकद वाढल्याने पिंपरीतून विधानसभेसाठी सर्वाधिक भाजपाकडे इच्छुक होते. तब्बल सात ते आठ जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे सर्वांनीच त्याबाबत कोणतीच वाच्यता न करता महायुतीचे काम करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी महायुतीचे उमेदवार विजयी करण्याच्या वल्गना सुरू केलेल्या असतानाच पिंपरीतून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेल्या अमित गोरखे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्यामुळे महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे. अमित गोरखे हे उद्या गुरुवारी आपला अर्ज अपक्ष म्हणून दाखल करणार असल्याने महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे.
… गौतम चाबुकस्वारांना अपशकुन
सन 2014 मध्ये पिंपरी विधानसभेसाठी तिरंगी लढत झाली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत चाबुकस्वार हे अत्यंत कमी मताने विजयी झाले होते. यावेळीही तिरंगी लढत झाल्यास चाबुकस्वार यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता असून युतीतील मित्र पक्षाकडून त्यांची वाट बिकट केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही बंडाळी विरोधकांसाठी फायदेशीर ठरु शकते.
गोरखे यांना द्यावा लागणार राजीनामा
अमित गोरखे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष असल्याने त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. अमित गोरखे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय कायम ठेवल्यास त्यांना साठे महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.