स्पिरिटचा टेम्पो पकडला : दारु तयार करणारी टोळी जेरबंद
शिरूर (प्रतिनीधी) – येथील परिसरातून अवैधरित्यास्पिरिटची (मद्यार्क) वाहतूक करणारा टेम्पो उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला आहे. यावेळी स्पिरीटचा वापर करून अवैधरित्या देशी दारू तयार करणाऱ्या टोळीसह चार वाहने व 75 लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बार्शी (जि. सोलापूर) येथून ताब्यात घेतला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना खात्रीलायक मिळालेल्या माहितीनुसार शिरूर परिसरातून अवैध वाहतूक करणारा टेम्पो क्र. (एमएच 25 पी 3803) ची झडती घेतली असता, टेम्पोतून 750 लिटर अतिशुद्ध मद्यार्क (स्पिरिट) आढळून आले. यावेळी वाहतूक करणाऱ्या टेम्पोतील हनुमंत जोगदंड, कृष्णा जोगदंड आणि वासुदेव जोगदंड (सर्व रा. वानगाव, ता. बीड) या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्यांनी हे स्पिरीट औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर-आंबेवाडी रस्ता येथील एका टॅंकरमधून आणल्याची माहिती दिली.
त्यावरून भरारी पथकाने औरंगाबाद जिल्ह्यात जाऊन स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या टॅंकर चालकांकडे चौकशी केली. त्यावेळी चालक श्रीराम शिंदे व कल्याण जाधव यांनी टॅंकरमधील स्पिरिट हनुमंत जोगदंड यांना दिल्याचे कबूल केले. तसेच त्यांनी बार्शी (जि. सोलापूर) येथे अवैधरित्या देशी दारूचे उत्पादन घेण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यावरून भरारी पथकाने नारी माळेगाव (ता. बार्शी) येथे छापा टाकून देशी दारू तयार करणाऱ्या टोळीला जेरबंद केले.