भिगवण येथील चर्चासत्रात डॉ. कुरणे यांचे प्रतिपादन
भिगवण (वार्ताहर) – महात्मा फुले व सावित्रीबाई हेच खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रीवादाचे आद्य प्रवर्तक आहेत, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे यांनी केले.
भिगवण (ता. इंदापूर) येथील महाविद्यालयांमध्ये साहित्यातील स्त्रीवाद या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोणतीही चळवळ म्हंटले की, तिचे मुळ पाश्चात्य देशामध्ये शोधण्याचा प्रयत्न होतो. स्त्रीवादी चळवळ याला अपवाद आहे. स्त्रीवादी चळवळीचे मुळ भारतात असुन त्याची सुरुवात महात्मा फुले यांनी केली. फुले यांनी स्त्रियांच्या सामाजिक न्यायासाठी लढा उभारला. सावित्रीबाईच्या शिक्षणाला प्रोत्साहन देऊन स्त्रियांना शिक्षण दिल्यास मोठे परिवर्तन होते यांचे उदाहरण समाजासमोर ठेवले.
कला महाविद्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी इंदापुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा होते. यावेळी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख तुकाराम रोंगटे, माजी सरपंच पराग जाधव, विकास समिती सदस्य संपत बंडगर, प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, समन्वयक डॉ. प्रज्ञा लामतुरे उपस्थित होते. यावेळी डॉ. तुकाराम रोंगटे, अध्यक्ष मुकुंद शहा डॉ. संदीप सांगळे, डॉ. जया कदम, डॉ. श्रीराम गडकर, डॉ. राजाराम गावडे, डॉ. सिमा गोसावी यांनी मार्गदर्शन केले. 60 संशोधक प्राध्यापकांनी आपले शोध निबंध सादर केले.
चर्चासत्राचा समारोप मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे यांच्या उपस्थितीत झाला. प्रास्ताविक डॉ. प्रज्ञा लामतुरे, सुत्रसंचालन डॉ. प्रशांत चवरे व प्रा. शाम सातर्ले यांनी तर आभार प्रा. पद्माकर गाडेकर यांनी मानले. प्रा. संदीप साठे, प्रा. सुरेंद्र शिरसट, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.