दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांची अस्वस्था टिपण्यासाठी सरसावला
जिल्हा प्रतिनिधी
पुणे – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला महाराष्ट्रात शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने जोरदार तयारी केली असून, पुणे जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात खेचण्याची रणनीती आखली जात आहे. ठाकरे शिवसेनेतील दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांमधील अस्वस्थता टिपून भगदाड पाडण्याचे नियोजन असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे. ठाकरे गटासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्यकर्ते आणि पदाधिकारीही फोडण्यासाठी शिंदे गट ऍक्टिव्ह झाला आहे.
जून महिन्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपच्या मदतीने सरकार स्थापन झाले. तब्बल 40 आमदार फुटल्याने शिवसेनेसाठी मोठा झटका बसला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच आमदार फुटताना संघटना व संघटनेच्या चिन्हावर देखील दावा केला. सध्या हा वाद न्यायप्रविष्ट आहे; परंतु एकीकडे न्यायालयीन लढाई लढत असताना दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला भगदाड पाडण्याचे नियोजन शिंदे गटाकडून केले जात आहे.
यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता टिपली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या दुसऱ्या फळीमध्ये अस्वस्थता आहे. संघटनेत पहिल्या क्रमांकावर येताना पहिल्या फळीतील पदाधिकाऱ्यांची अडचण आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून काम करूनही चांगली संधी मिळत नसल्याची भावना तयार झाली. अस्वस्थतेची ही भावना फिरून नव्याने स्थापन झालेल्या शिंदे गटाने दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना गटात खेचण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
असा कयास या मागे?
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांच्या दृष्टीने ही तयारी असून, शिंदे गटाचे भाजपसोबत युती झाल्यास वेळेवर उमेदवारांची शोधाशोध करण्याची आवश्यकता भासणार नाही, असा कयास यामागे असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगली आहे.