शिक्रापूर -येथे दहा दिवसांपूर्वी एका डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचे समोर आले असतानाच शिक्रापूर येथे राहणाऱ्या एकाचा करोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर गावातील सर्वच रस्ते बंद करून गाव पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे.
मृत्यू झालेल्या व्यक्तीने (दि. 17) व (दि. 22) शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेतल्याने शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयामधून त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले सहा अधिकारी, कर्मचारी यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
एका व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाल्याची वार्ता नागरिकांना समजल्यामुळे दिवसभर नागरिकांनी घरात राहणे पसंत केले आहे. रस्त्यावर नागरिकांची गर्दी कमी दिसत होती. परंतु वारंवार करोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण
झाले आहे.
शिक्रापूर येथे दहा दिवसांपूर्वी एक करोना बाधित डॉक्टर आढळून आला होता. त्यावेळी या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या 144 गरोदर महिलांना आणि हॉस्पिटलच्या आठ कामगारांना होम क्वारंटाइन करण्यात आले असताना विठ्ठलवाडी येथे एक करोना संशयित मुलगी आढळून आली.
नुकताच शिक्रापूर येथील एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली. त्यामुळे प्रशासनाने देखील कडक पाऊले उचलली आहेत. आता गावामध्ये येणारे सर्व रस्ते पुणे- नगर रस्ता वगळता बंद केले आहेत.
ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण राहत होता. तेथील सर्व परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने ठिकठिकाणी जनजागृती फलक लावत गाव 3 मेपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात
आला आहे.
शिक्रापूर येथील करोना बाधित मृत व्यक्ती दोनवेळा शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आलेला होता. या रुग्णाची तपासणी करणाऱ्या मुख्य डॉक्टर, सिस्टर यांसह सहा जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
– डॉ. वैजिनाथ काशीद,
वैद्यकीय अधीक्षक, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय.
विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई
शिक्रापूर येथे राहणाऱ्या एकाचा करोनाने मृत्यू झाल्याने गावामधील सर्व रस्त्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. संपूर्ण गावामध्ये औषध फवारणी करण्यात आली आहे. गावात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करणार असल्याचे शिक्रापूरचे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब गोरे यांनी सांगितले.
शिक्रापूरात सर्व्हे सुरू
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे म्हणाले की, शिक्रापूर येथे करोना बाधित मृत व्यक्ती राहत असलेल्या ठिकाणी आरोग्य विभागाने सर्व्हे सुरू केला असून नागरिकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
शिक्रापूर येथे यापूर्वी बाधित डॉक्टर आढळला. त्यानंतर विठ्ठलवाडी येथे एक रुग्ण आढळला आहे. आता शिक्रापूर येथील करोना बाधिताचा मृत्यू झाल्याने शेजारील तळेगाव ढमढेरे 9 मेपर्यंत गाव बंद राहणार आहे.