सातारा -करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरु असताना विनापरवाना तळेगाव दाभाडे(पुणे) येथून बुध ( ता. खटाव येथे आल्याने इक्बाल कादर शेख व त्याच्या पत्नीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत पुसेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून दै. ‘प्रभात’चे पुसेगाव प्रतिनिधी प्रकाश राजेघाटगे यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर संशयित गावगुंड आमिर शमशुद्दीन शेख व त्याचा भाऊ जहांगीर शमशुद्दीन शेख यांच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी, बुध (ता. खटाव) येथील शेख यांच्याकडे कादर हा त्याच्या पत्नीसह राहण्यास आला होता. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याची बातमी राजेघाटगे यांनी केली होती. त्याचा राग मनात धरून गावगुंड शेख या भावांनी राजेघाटगे यांच्या घरात घुसून दि. 24 रोजी बातमी छापल्याचा जाब विचारात लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर या गावगुंडांनी राजेघाटगे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत.
मारहाणीचा जिल्ह्यातील पत्रकारांकडून निषेध
या घटनेची माहिती मिळताच खटाव तालुक्यातील पत्रकारांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत, घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, “प्रभात’चे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकारांनी राजेघाटगे यांना मानसिक आधार दिला. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना घटनेची माहिती देत, कडक कारवाई करण्याची मागणी केली.