शेवगाव (प्रतिनिधी) – येथील आयटीआय शेजारच्या मोकळ्या जागेत 60 वर्षीय वृद्ध महिलेचा मुंडके नसलेला मृतदेह, तर काही अंतरावर 10 ते 15 वर्षांच्या मुलाचाही मृतदेह आढळून आल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव पोलीस ठाण्यात कोणीतरी फोन करून पाथर्डी रोडवर असलेल्या आयटीआय लगत मोकळ्या जागेत एक महिला मृत्युमुखी पडल्याची माहिती दिली. त्यानंतर शेवगाव पोलीस ठाण्याचे सपोनि विश्वास पावरा, सपोनि सुजित ठाकरे, रवी शेळके, सुधाकर दराडे, अच्युत चव्हाण यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली.
या पोलीस पथकाने तेथे पाहणी केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पाहणी केली असता, एक वृद्ध महिला मृतावस्थेत आढळून आली. मात्र, या मृतदेहाला मुंडके नव्हते. पोलिसांनी आसपास तपास केला असता मुंडके आढळून आले नाही. मात्र, तेथे काही अंतरावर आणखी 10 ते 15 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला.
या मुलाच्या डोक्याचाही काही भाग व कान गायब आहे. महिलेल्या मृतदेहाशेजारी भांडी, पेटी, गोणपाट, तर मुलाच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेली काठी, असे साहित्य आढळून आले. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून, नगर येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, ते मृतदेहापासून काही अंतरावर घुटमळत राहिले. त्यामुळे खुन्याचा तपास लावण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.