नगर जिल्ह्यातील शेवगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी ऍड. प्रताप ढाकणे यांना जाहीर झाल्याचे समजताच माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या गोटात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांमधील असलेली खदखद समोर आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत घुले काय भूमिका घेणार, हे महत्वाचे मानले जात आहे.
पक्ष स्थापनेपासून घुले घराणे राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले. पक्ष स्थापनेच्या प्रक्रियेत लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील सहभागी होते. त्यावेळी घुले पाटील बोधेगाव येथील कार्यक्रमात होते. त्यांनी लगेच त्याच बैठकीत राज्यात कोणीही कोठेही जावो, आपण शरद पवार यांच्याबरोबरच राहू, अशी भूमिका जाहीर केली होती. राजकीय समीकरण आणि पक्षाचे हित लक्षात घेऊन प्रसंगी दोन पावले मागे सरकून पांडुरंग अभंग यांच्यासारख्या उमेदवाराला उभे करून अटीतटीच्या लढतीत निवडून आणले. यावेळी पक्षाची रितसर मुलाखत दिली असतांना श्रेष्ठींनी पक्षाची धरसोड करणाऱ्या ऍड. ढाकणे यांना उमेदवारी दिली. यामुळे घुलेंना मानणारे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाल्याचे दिसते. स्वतः घुले यांनी प्रत्यक्षात या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. तालुक्यातील बहुतेक सर्व सहकारी संस्था आजही घुले बंधूच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यांनी गप्प बसावे हे सामान्य कार्यकर्त्यांना पसंत नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत.
2014 च्या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे त्यांचा संपर्क काही प्रमाणात कमी झाला, तरी विविध प्रश्न धसास लावण्यासाठी मोर्चे, आंदोलात घुले आघाडीवर राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी आता मैदान सोडू नये, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत.