समीरण बा. नागवडे
आ. जगताप यांची दुहेरी भूमिका
आमचा एकच नेता शरद पवार असे आ. जगताप यांनी नुकत्याच नगर दौऱ्यावर शरद पवार यांच्या उपस्थिती झालेल्या मेळाव्यात म्हटले होते. त्या मेळाव्यातील आ. जगतापांच्या उपस्थितीमुळे अन्यत्र पक्षांतराचा विषयावर पूर्णविराम मिळाला असे वाटले, पण आ. जगताप यांच्याकडून अजूनही पक्षांतरांच्या हालचाली सुरू असल्याने त्यांच्या या दुहेरी भूमिकेबद्दल जोरदार चर्चा आहे.
श्रीगोंदा – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तरीही श्रीगोंद्यातील राजकीय चित्र अद्याप अस्पष्टच असल्याची परिस्थिती आहे. प्रमुख उमेदवार कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे नेते भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असताना माजी मंत्री पाचपुते मात्र भाजपच्या उमेदवारीबाबत निर्धास्त आहेत.
सध्या तालुक्यातील प्रमुख उमेदवार भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी “फिल्डिंग’ लावून आहेत. आमदार राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, अण्णासाहेब शेलार, मनोहर पोटे यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेत भाजप शिवसेना युतीतर्फे आ. जगताप अथवा नागवडे दोघांपैकी ज्याला उमेदवारी मिळेल, त्याच्यामागे राहण्याचे ठरवल्याचे समजते. एकीकडे आ. जगताप आणि नागवडे हे “आम्ही एकत्रच’ असल्याचे सांगत आहेत. त्याचवेळी आ. जगताप व नागवडे दोघेही स्वतंत्र यंत्रणेमार्फत भाजपची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे हे भाजपच्या वरीष्ठ मंत्रांच्या संपर्कात असल्याचे समजते. नागवडेंसह आ.जगताप यांनी भाजप प्रवेश केल्यास नागवडेंना भाजपची उमेदवारी मिळू शकते.
मात्र आता श्रीगोंद्याची जागा युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने मंगळवारी दुपारी आ. जगताप यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली. याबाबत आ.जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, मात्र आ.जगताप हे मुंबईत असल्याची खात्रीशीर माहिती समजली. राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे हे देखील तालुक्याबाहेर आहेत. नागवडे हे भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असताना श्रीगोंद्याची जागाच शिवसेनेला सुटणार असल्याची बातमी आल्याने आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.
दुसरीकडे माजीमंत्री बबनराव पाचपुते यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याबद्दल खात्री असल्याने ते धुळे येथे सुरू असलेल्या भाजपच्या उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता संकल्प मेळाव्यात सहभागी झाले होते. आ. जगताप, नागवडे हे आघाडीतर्फे उमेदवारी करण्यास उत्सुक नसल्याने राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांचे नाव आघाडीतर्फे पुढे येत आहे. मात्र शेलार यांच्यावर अकोला मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती समजली. त्यामुळे शेलारांचा श्रीगोंद्याच्या उमेदवारीबाबत कितपत विचार होणार हेही पाहणे महत्वाचे आहे. एकूणच प्रमुख इच्छुकांनी भाजपकडे चालवलेली लॉबिंग, युतीचे अंधारात असलेले भवितव्य, प्रमुख इच्छुक आणि त्यांच्या पक्षबाबत असलेली अनिश्चितता यामुळे तालुक्यातील विधानसभेचे चित्र अद्याप अस्पष्टच असून तालुक्यात दुरंगी, तिरंगी की बहुरंगी लढत होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.