Eknath Khadse : राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे ((Eknath Khadse)) यांना काल हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्री त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला उपचारासाठी नेण्यात आले. सध्या एकनाथ खडसे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी रुग्णालयात जाऊन एकनाथ खडसे यांची भेट घेत विचारपुस केली.
एकनाथ खडसे यांच्यावर उपचार करणारे डॉ.अभिषेक ठाकुर यांनी खडसेंच्या तब्येतीविषयीची माहिती शरद पवार यांना दिली. यावेळी खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे देखील तेथे उपस्थित होत्या. रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांनी खडसे यांची रुग्णालयात भेट घेतल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
आज सकाळी @NCPspeaks राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अध्यक्ष आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार @PawarSpeaks साहेबांनी ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे @EknathGKhadse यांची मुंबईतील रुग्णालयात भेट घेवून तब्येतीची चौकशी केली. pic.twitter.com/H3DIyWINqI
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) November 6, 2023
नेमकं काय घडलं होतं?
एकनाथ खडसे यांना रविवारी दुपारी हृदयविकाराचा झटका आला होता. दुपारच्या सुमारास खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची स्थिती पाहाता पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी शेतात फेरफटका मारत असतानाच त्यांना एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबाबत माहिती समजली. फोन येताच मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याबाबत आदेश दिले होते.