Bahubeej of Pawar family : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर राज्यातील राजकीय गणित पूर्णपणे बिघडले आहे. या बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. त्यानंतर बंडानंतर यंदाची पहिली दिवाळी आहे. ज्यामध्ये सगळे पवार कुटुंब एकत्र दिसून येत आहेत.
दरम्यान, काल दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गोविंदबागेत अजित पवार गैरहजर राहिल्यानंतर आज काटेवाडीत सुप्रिया सुळे भाऊबीज साजरी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागेल असताना आता काटेवाडीत सर्व पवार कुटुंबीय एकत्र जमले असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आज काटेवाडीत अजित पवार यांच्या निवासस्थनी दाखल झाल्या आहेत. याठिकाणी त्या अजित पवारांसोबत भाऊबीज साजरी करणार आहेत. राजकीय मतभेद एका बाजुला आणि कौटुंबिक सलोखा आणि नाती एका बाजुला असे यापूर्वीही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले होते. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर काही फोटो देखील शेअर केले आहेत.
भाऊबीज निमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार हे अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी दाखल झाले. राजकीय दृष्ट्या कितीही मतभेद झाले तरी दिवाळी सणाला पवार कुटुंब एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यावेळी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह पवार कुटुंबातील विविध सदस्य अजित पवार यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. या भेटीनंतर अजित पवार अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती.