भाजप सरकार उलथवून देशात व राज्यात परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही – शरद पवार

अमरावती : आज सबंध देशात एक चिंतेचे वातावरण आहे, देशातील लोकशाही धोक्यात आहे, याला एकमेव व्यक्ती कारणीभूत आहे, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी होय. पुन्हा याच विचारांचे सरकार जर सत्तेत आले तर देशात लोकशाही टिकेल की नाही ? हा प्रश्न आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

अमरावती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाघाडीच्या उमेदवार नवनीतकौर राणा यांच्या प्रचारासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा झाली. संत ज्ञानेश्वर संस्कृतिक भवनात झालेल्या प्रचार सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये आले तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण माझा आपल्या देशातील लोकांवर प्रचंड विश्वास आहे. लोकशाहीला वाचवण्यासाठी निर्णय घेण्याची ज्यावेळी वेळ येते तेव्हा लोक लोकशाहीच्या बाजूनेच निर्णय घेत असतात.

देशात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकारने अनेक आश्वासने दिली, मात्र शेवटी जनतेची फसवणूक केली. त्यामुळे संयुक्त पुरोगामी लोकशाही महाआघाडीच्या अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांच्यासारख्या उमेदवारांना निवडून आणणे प्रचंड गरजेचे आहे, असं शरद पवार यावेळी म्हटले.

या सरकारने धनगरांना फसवले, राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात उभे राहिले, राज्यात आघाडी सरकार असताना मुस्लीम समाजाला दिले गेलेले आरक्षण हे सरकार येताच काढून घेतले गेले. त्यामुळे हे सरकार उलथवून देशात व राज्यात परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही, असं पवार म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.