Amravati Lok Sabha Election 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी उद्या (24 एप्रिल) अमरावतीतील सायन्स कोर मैदानावर अमित शहा यांची भव्य प्रचार सभा होणार आहे. मात्र याच ठिकाणी प्रहारचे बच्चू कडू यांनी पैसे भरून रितसर परवानगी घेतली असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सायन्स कोर मैदानाच्या जागेवरुन येथील वाद आता चिघळला आहे. बच्चू कडू आज मैदान पाहणीसाठी गेले असता पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर कडू आक्रमक झालेले पहायला मिळाले. पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ठाण मांडून मैदानाच्या बाहेर बसून राहिले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ज्या मैदानावर उद्या भाजपने सभेचे आयोजन केले आहे, त्याच मैदानासाठी प्रहरच्या वतीने पैसे भरून त्याच दिवसाची रितसर परवानगी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. परिणामी, मैदान मिळवण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून देखील ऐन वेळेवर हे मैदान भाजपला देण्यात येत असल्याने प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यांनी थेट आता जिल्हा प्रशासनाला इशारा देत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
जर 24 तारखेला आम्हाला सायन्स कोर मैदान उपलब्ध करून दिले नाही, तर आम्ही एक लाख लोकं जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बसू, असा इशारा बच्चू कडूंनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आता बच्चू कडू यांची समजूत कशी घालणार हा पेच त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. उद्या सायन्स कोर मैदानावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी जमा व्हावं, अशा सूचनाही प्रहारकडून करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या या सभेला वादाची किनार असल्याची शक्यता आहे.
मैदानाचे सर्व गेट पोलिसांनी केले बंद –
संभाव्य परिस्थिति लक्षात घेता सायन्स कोर मैदानाचे सर्व गेट पोलिसांनी बंद केले आहेत. बच्चू कडू स्वत: या मैदानात पाहणी करण्यासाठी आले. त्यामुळे सुरक्षेच्या अनुषंगाने मैदानावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बच्चू कडू यांना गेटवरच पोलीस थांबवलं. बराच वेळ पोलिसांनी बच्चू कडू यांची समजूत काढली. आता पुढे बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे.
बच्चू कडू पोलिसांवर संतापले –
येथील सायन्सकोर मैदानावर कार्यकर्त्यांसह पोहोचलेल्या बच्चू कडूंनी आक्रमक बाणा दाखवत पोलिसांना सवाल केला. तसेच तुम्ही नि:पक्ष आणि सर्वांना समान न्याय देणार असल्याची शपथ घेता, त्या शपथेचा अपमान केला. आपण घेतलेल्या शपथेची आठवण ठेवा, असे म्हणत बच्चू कडूंनी पोलिसांना जाब विचारला. यावेळी, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे पाय धरुन गांधीगिरी करण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून आलं. तर, आमची परवानगी असतानाही आम्हालाच मैदाना मिळत नसेल तर, सलाम तुमच्या वर्दीला अशी उपरोधात्मक टीकाही बच्चू कडूंनी केली.
मतदारसंघात चौरंगी लढत –
या मतदारसंघात महायुतीच्या वतीने खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील हे प्रतिस्पर्धी असणार आहे. अशातच महायुतीचाच भाग असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी थेट आपला उमेदवार उतरवत भाजपच्या उमेदवार नवनीत राणांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. अमरावतीत प्रहारने दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे रिपब्लिन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. एकुणात या मतदारसंघात रंगतदार लढत होणार आहे.