मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. मात्र ही छापेमारी राजकीय हेतूने केल्याचा आरोप नाना पटोले यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी केला. यावर आता उत्तर देताना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कागदपत्रांशिवाय ईडी कोणतीही कारवाई करत नसल्याचे सप्ष्ट केले. त्यासोबतच त्यांनी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यावर जरंडेश्वरी साखर कारखान्यावरून खोचक टीका केली आहे. या कारवाई दरम्यान, संपूर्ण पवार कुटुंब हातात ग्लिसरीनची बॉटल घेऊन लाईनमध्ये रडत उभे होते असा टोला देखील यावेळी लगावला.
जरंडेश्वरी साखर कारखान्याविषयी बोलताना सोमय्या यांनी,“अजित पवारांचा जरंडेश्वर जप्त झाला ना?, न्यायालयाने मान्यता दिली ना? शरद पवार पण रडत होते. ग्लिसरीनची बॉटल घेऊन सगळे पवार लाईनमध्ये उभे होते टीव्हीवर. सगळ्या चॅनेलवर. कधी सुप्रिया सुळे रडताना दिसायच्या. कधी त्यांच्या ताई कधी कुणाची माई, कधी कुणाची बायको, कुणाचा मुलगा.. सगळे लाईनीत पवार. सदनभर पवार रडत होते ग्लिसरीनच्या बॉटल वापरुन,” असा टोला सोमय्यांनी लगावला. “का ओ? आता न्यायालयाने दिलं ना. अजित पवारांवर बेनामी संपत्तीच्या अंतर्गत पण चौकशी सुरु आहे. तुम्ही लुटणार आणि महाराष्ट्राची जनता बघत बसणार असे होणार नाही,” असेही सोमय्या म्हणाले.
“हे पाटोळे असो किंवा त्यांचा वकील असो की कोणीही असो, घोटाळा केला कारवाया होणार. उद्धव ठाकरेंचा मेहुणा, उद्धव ठाकरेंची पत्नी, उद्धव ठाकरेंचा मोठा मुलगा आहे, उद्धव ठाकरेंचा छोटा मुलगा आहे. म्हणून त्यांना मनी लॉण्ड्रींग करण्याचा अधिकार नाही मिळत. कारवाया होणार,” असे सोमय्या म्हणाले आहेत.