सातारा (प्रतिनिधी) – शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत करोनाचा शिरकाव झाला आहे. शिवाजीनगरमध्ये दोन बाधित रुग्ण आढळल्याने शाहूपुरीकरांची चिंता वाढली आहे. त्यामुळे ग्राम समिती सतर्क झाली असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
शाहूपुरीत करोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीकडून दोन वेळा जंतुनाशक फवारणी करण्यात आली होती. गेंडामाळ नाका परिसरातील वृद्ध महिला बाधित झाल्याने चिंता वाढली होती. त्यानंतर ग्रामपंचायत अधिक सतर्क झाली होती. सॅनिटायझरची फवारणी करून प्रत्येक वॉर्डात पदाधिकारी व सदस्यांनी जनजागृती केली होती.
ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्ष तयार केला असून बाहेरून आलेल्या नागरिकांना त्यामध्ये ठेवण्यात येत आहे. अनेक जण होम क्वारंटाइन आहेत. शिवाजीनगर परिसरातील एका अपार्टमेंटमधील दोन रहिवशांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने धास्ती वाढली आहे. होम क्वारंटाइन असलेल्या लोकांवर ग्राम समितीकडून वॉच ठेवण्यात येत आहे. नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये, दुकानांमध्ये गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.