लोणंद (प्रतिनिधी) – लोणंद जवळच असणाऱ्या अंदोरी (ता. खंडाळा) येथील संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, अंदोरीत करोनाचा रुग्ण सापडल्यामुळे लोणंदसह खंडाळा तालुक्याची धडधड वाढली आहे.
अंदोरी येथील करोनाबाधित व्यक्ती ही मुंबईतील बाधित क्षेत्रातून 16 तारखेला पत्नी, दोन मुले, चालक यांच्यासह अंदोरी येथे आलेली होती. या सर्वांना 17 रोजी आरोग्य सेविका यांनी माहिती घेऊन होम क्वारंटाइन केले होते. संबंधित व्यक्ती ताप, सर्दी, खोकला येत असल्याने 19 रोजी अंदोरी प्राथमिक केद्रांत उपचारासाठी आला होता. त्यावेळी त्याला अंदोरी येथून उपचारासाठी सातारा येथे पाठवण्यात आले होते. तेथे औषधोपचार करुन परत घरी पाठवण्यात आले होते. मात्र पुन्हा जास्त त्रास होऊ लागल्याने 22 मे रोजी संबंधिताला सिव्हिल हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आले.
सदर 43 वर्षीय व्यक्तीचा शनिवारी रात्री उशिरा करोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आला. त्यानंतर बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील दहा जणांपैकी आठ जणांना शिरवळ येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य 19 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी अविनाश पाटील यांनी सांगितले आहे.
अंदोरी येथील रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे कळताच खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील, लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी तातडीने या गावच्या परिसराची पाहणी केली असून, संपूर्ण अंदोरी गाव सील करण्यात आले आहे.
आरोग्य विभागामार्फत अंदोरी परिसराची आरोग्य तपासणी करण्यासाठी 11 पथके तयार करण्यात आली असून, 14 दिवस दररोज गावातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्यासह पोलिसांनी गावात येणाऱ्या रस्त्यांवर बंदोबस्त ठेवला आहे.