जुन्नर -राज्यात सर्वत्र करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना जुन्नर तालुक्याने संचारबंदीच्या नियंमांचे काटेकोर पालन करत करोनाला दूर ठेवले होते. मात्र, या ग्रीन झोनमध्ये पाहुण्यांच्या रूपाने पुन्हा एकदा करोनाचा शिरकाव झाला आहे.
मुंबईहून धोलवड येथे आलेल्या दोन आणि सावरगावातील दोघांचे जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी डिंगोरे येथे मुंबईहून आलेल्या रुग्णाचा अहवाल पॉझेटिव्ह आला होता. त्यामुळे तालुक्यातील संख्या आता पाचवर गेली आहे.
दरम्यान, गोळेगाव व उच्छिल येथील प्रत्येकी एका रुग्णाचे अहवाल तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते, ते निगेटिव्ह आल्यामुळे तालुक्याला दिलासा मिळाला आहे. तर जुन्नर शहरातील दोन संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे शुक्रवारी (दि. 22) प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, त्या दोघांच्या चाचण्यांबाबात संदिग्धता (इन्कंक्लूजीव) असल्यामुळे त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सवरगाव, धोलवड व परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनचे नियम शिथील केल्यामुळे पुण्या-मुंबईकडून वैध-अवैध मार्गाने जुन्नरकर मंडळी करोना बाधित क्षेत्रातून रात्री अपरात्री कुटूंबासह गावी येत आहेत.
दोन महिन्यांपासून पोलीस, महसूल प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यात करोनाचा अटकाव झाला होता. तसेच स्थानिक तरूण मंडळी, गावोगावचे लोकप्रतिनिधी यांनीही मोठी भूमिका निभावली होती.
मात्र राज्यशासनाने नियम शिथिल केल्यामुळे ग्रामीण भागातील धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी घाबरून न जाता शक्यतो घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले आहे.