इस्लामाबाद – करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या जेवणाचा तसेच अन्य गोष्टी उपलब्ध करुन देत असलेल्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने मास्कचा वापर न करता अन्नधान्य वाटप केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे त्याच्या या चुकीचा फटका आता अनेकांना बसण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
जगभरात करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच चित्र पाकिस्तानातही दिसत आहे. अशा वेळी केवळ नागरिकांना आवाहन करण्यात वेळ न घातवता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे आलेल्या आफ्रिदीच्या सामाजिक बांधिलकीचे अनेकांनी कौतुक केले. भारतीय क्रिकेटपटू युवराजसिंग व हरभजनसिंग यांनीही त्याची पाठ थोपटली होती. मात्र, आफ्रिदी मास्क न वापरता लोकांच्या संपर्कात येत आहे तसेच सोशल डिस्टंन्सिग धाब्यावर बसवुन लोक अन्नधान्य घेण्यासाठी गर्दी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
आफ्रिदीने ज्या ज्या ठिकाणी अन्नधान्याचे वाटप केले त्या भागांमध्ये संचारबंदी लागु करण्यात आली होती. मात्र, या सगळ्याचे कोणतेही गांभीर्य यावेळी दिसले नाही म्हणुनच आता त्याच्या कौतुकाच्या जागी टीका सुरु झाली आहे.